आकलन उतारा
परिच्छेद क्रमांक ९
जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्व प्रथम दर्शविणारे व महत्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच पहिले महाराष्ट्रीयन राजघराणे होय. सातवाहनांचा इतिहास कोल्हापूर, पैठण, कऱ्हाड, नाशिक, भोकरदन येथे सापडलेल्या पुरातत्वीय अवशेषांवरून मिळतो. कार्ले, भाजे, बेडसे, पितळखोरा, अजंठा, कान्हेरी येथील लेणी, स्तूप, विहार, शिलालेख याद्वारे सातवाहन इतिहासावर प्रकाश पडतो. गुणाढ्याची ‘बृहत्कथा’, राजा हाल याचा गाथा सप्तशती इत्यादी साहित्य व परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने यावरून माहिती मिळते. सिमुक राजाने स्थापन केलेल्या या राज्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण ही होती. कलिंग नरेश खारवेल याचा पराभव करणारा सातकर्णी प्रथम व त्याची पत्नी नागनिका यांच्या प्रतिमा कोरलेल्या जुन्नर जवळील नाणेघाटात गुहेत मिळतात. गौतमीपुत्र सातकर्णीचे राज्य तर संपूर्ण भारतीय पठारावर माळव्यापासून ते हिंदी महासागरापर्यंत पसरले होते. यज्ञश्री सातकर्णी तर शेवटचा सातवाहन राजा होय. त्याचा उल्लेख ‘गलबताचे चित्र’ असलेल्या नाण्यांवरून समजतो.
प्रश्न :
१) सातवाहन आहे एक –
१) राज्य, २) राजघराणे, ३) शहर, ४) वाहनाचे नाव.
२) सातवाहन काळातील राजधानीचे शहर –
१)कोल्हापूर, २) पैठण, ३) कऱ्हाड, ४) नाशिक.
३) सातवाहन काळातील कोणता राजा लेखन करीत असे, हे जाणवते. –
१) यज्ञश्री सातकर्णी, २) सातकर्णी, ३) राजा हाल, ४) सिमुक राजा.
४) खारवेल होता एक –
१) एक वेलीचा प्रकार, २) कलिंग प्रदेशातील वृक्ष, ३) नागनिका राणीचा भाऊ, ४) कलिंगचा राजा.
५) लेणी या पदबंधाचा अर्थ असावा. –
१) मंदिर, २) ताकावरील लोणी, ३) डोंगरातील दगडी शिलांवर केलेली कलाकुसर, ४) सातवाहन कालिन मंदिरे.
६) यज्ञश्री सातकर्णी याच्या नाण्यांवर होते. –
१) मोराचे चित्र, २) राजसिंहासनाचे चित्र, ३) एक रथ, ४) जहाजाचे चित्र.
उत्तरे : १) 2 , २) 2 , ३) 3 , ४) 4 , ५) 3 , ६) 4 .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक शैक्षणिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यासासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित स्रोत तपासा.