रविवार, ३१ मे, २०२६

आकलन उतारा / परिच्छेद क्रमांक ९

 आकलन उतारा


परिच्छेद क्रमांक ९


जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्व प्रथम दर्शविणारे व महत्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच पहिले महाराष्ट्रीयन राजघराणे होय. सातवाहनांचा इतिहास कोल्हापूर, पैठण, कऱ्हाड, नाशिक, भोकरदन येथे सापडलेल्या पुरातत्वीय अवशेषांवरून मिळतो. कार्ले, भाजे, बेडसे, पितळखोरा, अजंठा, कान्हेरी येथील लेणी, स्तूप, विहार, शिलालेख याद्वारे सातवाहन इतिहासावर प्रकाश पडतो. गुणाढ्याची ‘बृहत्कथा’, राजा हाल याचा गाथा सप्तशती इत्यादी साहित्य व परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने यावरून माहिती मिळते. सिमुक राजाने स्थापन केलेल्या या राज्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण ही होती. कलिंग नरेश खारवेल याचा पराभव करणारा सातकर्णी प्रथम व त्याची पत्नी नागनिका यांच्या प्रतिमा कोरलेल्या जुन्नर जवळील नाणेघाटात गुहेत मिळतात. गौतमीपुत्र सातकर्णीचे राज्य तर संपूर्ण भारतीय पठारावर माळव्यापासून ते हिंदी महासागरापर्यंत पसरले होते. यज्ञश्री सातकर्णी तर शेवटचा सातवाहन राजा होय. त्याचा उल्लेख ‘गलबताचे चित्र’ असलेल्या नाण्यांवरून समजतो.



प्रश्न :

१) सातवाहन आहे एक –

१) राज्य, २) राजघराणे, ३) शहर, ४) वाहनाचे नाव.


२) सातवाहन काळातील राजधानीचे शहर –

१)कोल्हापूर, २) पैठण, ३) कऱ्हाड, ४) नाशिक.


३) सातवाहन काळातील कोणता राजा लेखन करीत असे, हे जाणवते. –

१) यज्ञश्री सातकर्णी, २) सातकर्णी, ३) राजा हाल, ४) सिमुक राजा.


४) खारवेल होता एक –

१) एक वेलीचा प्रकार, २) कलिंग प्रदेशातील वृक्ष, ३) नागनिका राणीचा भाऊ, ४) कलिंगचा राजा.


५) लेणी या पदबंधाचा अर्थ असावा. –

१) मंदिर, २) ताकावरील लोणी, ३) डोंगरातील दगडी शिलांवर केलेली कलाकुसर, ४) सातवाहन कालिन मंदिरे.


६) यज्ञश्री सातकर्णी याच्या नाण्यांवर होते. –

१) मोराचे चित्र, २) राजसिंहासनाचे चित्र, ३) एक रथ, ४) जहाजाचे चित्र.



उत्तरे : १) 2 , २) 2 , ३) 3 , ४) 4 , ५) 3 , ६) 4 .


आकलन उतारा / परिच्छेद क्रमांक ८

 उतारा मराठी आकलन

परिच्छेद क्रमांक ८

उंटाची मान लांब असल्यामुळे तोंड उंच करुन झाडाचा पाला ते सहज खाऊ शकतात. ते रवंथ करतात. त्यांच्या जठरात तिन कप्पे असतात. तिसरा कप्पा अवशेषी असतो. वाळवंटात पाणी मिळाले नाही तरी वाळवंटातील वनस्पती पासून मिळालेले पाणी उंटाला पुरेसे होते. त्याच्या वजनाच्या २० ते २५ टक्के पाणी कमी झाले तरी तो जिवंत राहू शकतो. त्याच्या शरीरा अंतर्गत रचनेमुळे उंट एकावेळी खूप पाणी पितो. हे पाणी त्याच्या जठरात असलेल्या पोकळ्यांमध्ये साठविले जाते. गरजेनुसार ते झिरपून पोटात येते. उंट सर्वसाधारणपणे ५० – ६० वर्षे जगतो. भारताच्या इतर कोणत्याही भागापेक्षा राजस्थानात उंट अधिक आहेत. हे सगळे पाळीव असून काहीजण त्यांचा व्यापार करतात. भारताच्या इतर भागात ते राजस्थानातून पाठवले जातात.

प्रश्न :

१) उंट वजनाच्या किती भाग पाणी कमी झाले तरी जगतो? –

१) अर्धा , २) पाव, ३) पाऊण ,४) ९९%

२) ‘रवंथी’ या पदबंधाचा अर्थ आहे. –

१) उंट झाडाचे काटे सोडून पाला खातो.

२) झाडाचा पाला खाऊन त्याचा चोथा बाहेर फेकतो.

३) पाला खाऊन नंतर तो पुन्हा तोंडांत घेऊन चावून बारीक करुन खाणे.

४) झाडाचा पाला खाणे व त्याच्या गोळ्या करणे.

३) उंटाच्या पोटात पाणी साठवले जाते. –

१)रक्तात, २) पोटात, ३) जठरातील पोकळ्यात, ४) आतड्यातील पोकळ्यात.

४)भारतात उंट जास्त पाळले जातात. –

१)कर्नाटकात, २) राजस्थानमध्ये,३) मध्यप्रदेशात,४) महाराष्ट्र राज्यात.

५) उंटाची वाळवंटातील पाण्याची गरज भागवली जाते. –

१) वनस्पती पासून, २) उंटाच्या त्वचेपासून, ३) वाळवंटातील पाण्यापासून, ४) दवबिंदू पासून.

उत्तरे : १) 2 ,२) 3 , ३) 3 , ४) 2 , ५) 1 .


आकलन उतारा /परिच्छेद क्रमांक ७

 उतारा मराठी आकलन


परिच्छेद क्रमांक ७


दक्षिणेत अमेरिका खंडात वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. अमेझॉन ही या खंडातील सर्वात मोठी नदी असून घनदाट वर्षा अरण्याने ती वेढलेली आहे. अमेझॉनचे खोरे ७० दशलक्ष चौ. कि. मी. पसरलेले आहे. या खोऱ्याचे ६० % अरण्य ब्राझील देशात तर १३ % पेरू व १० टक्के कोलंबियात आहे. उर्वरित वर्षारण्य, व्हेनेझुएला, इकवेडोर, गयाना, बोलिव्हिया, सुरीनाम या प्रदेशात आहे. जैवविविधतेने नटलेल्या या प्रदेशात बेडकांच्या विषारी जाती, मगरी, सुसरी, व महाकाय साप आनाकोंडा ( अजगर) सुद्धा आढळतो. जगातील सर्वात मोठी पाण वनस्पती ‘ अमेझॉन वॉटर लिली’ याच प्रदेशात आढळते. अमेझॉन मध्ये जगातील मोठ्या पाच नद्यांचे पाणी मावेल इतका जलस्त्रोत आहे. येथील प्रदेशात केव्हा निसर्ग चक्र बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून या प्रदेशात भटकंती करणे धोकादायक आहे.


प्रश्न :


१) अमेझॉन नदी आहे. –

१) अमेरिकेत, २) दक्षिण अमेरिका देशात, ३) दक्षिण अमेरिका खंडात, ४) आशिया खंडात.


२) ब्राझील व पेरू या देशात अमेझॉनचे खोरे किती टक्के आहे? –

१)१३,% २) ७५ % ३) ६० % ४) ७३%


३) पाण वनस्पती म्हणजे –

१) पाण्याच्या रंगाची असते. २) पाण्यामध्ये वाढणारी वनस्पती, ३) अमेझॉन नदीचे स्थानिक नाव, ४) विषारी बेडकाची जात.


४) उताऱ्यात किती सजीवांचा उल्लेख आलेला आहे?

१) पाच, २) चार, ३) तीन , ४) सहा सजीवांचा.


५) अमेझॉन नदीच्या खोऱ्यात भटकंती करणे धोक्याचे आहे. कारण –

१) ती जगातील सर्वात मोठी नदी आहे.

२) तिच्या प्रदेशात वर्षा अरण्ये आहेत.

३) अचानक होणारा पर्यावरणातील बदल.

४) तेथे विषारी बेडूक आहेत.


उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 2 , ४) 1 , ५) 3 .


आकलन उतारा / परिच्छेद क्रमांक ६

  उतारा

परिच्छेद क्रमांक ६

सहारा वाळवंट एक वाळूचा महासागर आहे. जगातील सर्वात मोठ्या या वाळवंटाचा विस्तार भूमध्य समुद्रापासून दक्षिणेत चाड सरोवरापर्यंत पसरलेला आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त सूर्य प्रकाश या प्रदेशास मिळतो. अल्जेरिया, मोरोक्को, नायजर, सुदान, ट्युनिशिया, चाड, इजिप्त, माली, मॉरिशिनिया या देशामध्ये ते पसरलेले आहे. ईमीकौसी हा येथील सर्वात उंच प्रदेश. तर क्वाहार डिप्रेशन हा सखल प्रदेश आहे. हिरवळीने नटलेला या वाळवंटाचा काही भाग ओयासिस नावाने ओळखतात. खुरट्या वनस्पती व खजुराची झाडे येथे आढळतात. येथे वर्षानुवर्षे पाऊस पडत नाही. पण पश्चिमेची नाईल हे वाळवंटाचे जीवन आहे. येथे पितवर्णी कोल्हे,विंचू, विषारी पाली, आफ्रिकन चित्ता, जंगली कुत्रे आढळतात. येथे वाहतुकीसाठी उंट हेच साधन आहे.

प्रश्न :

१) सहारा वाळवंटाच्या उत्तरेस आहे एक –

१)नदी, २) सागर, ३) चाड सरोवर, ४) मोरोक्को.

२) सहारा वाळवंटाचे जीवन असे नाईलला म्हणतात. कारण –

१) नाईलद्वारे तेथे पाणी पुरवठा होतो.

२) नाईल एकटीच तेथे जगते.

३) नाईल मुळे तिथे वर्षानुवर्षे पाऊस पडत नाही.

४) नाईल मुळे तेथे खजुराची झाडे जगत नाहीत.

३) सहारा वाळवंटातून प्रवास करतात. –

१) पायी, २) घोड्याद्वारे, ३) उंटाने, ४) आफ्रिकन चित्त्यावर स्वार होऊन.

४) वाळवंट पसरले आहे.-

१) सात देशात, २) आठ खंडात, ३) नऊ पर्वतांमध्ये, ४) नऊ देशांच्या भूभागात.

५) आफ्रिकन चित्याचा रंग असतो. –

१) काळा, २) राखाडी, ३) पिवळा, ४) तपकिरी.

६) सहारा वाळवंटाचे वैशिष्ट्ये आहे. –

१) सर्वाधिक सूर्यप्रकाश, २) सर्वाधिक पाऊस, ३) सर्वाधिक थंडी, ४) सर्वाधिक वनस्पती.



उत्तरे : १) 2 , २) 1 , ३) 3 , ४) 4 , ५) 3 , ६) 1 .


गुरुवार, २८ मे, २०२६

आकलन उतारा /परिच्छेद क्रमांक ५

 उतारा

परिच्छेद क्रमांक ५


कुसर नावाची झुडूप वजा वनस्पती सह्याद्रीच्या तसेच कोरड्या भागात ही मिळते. महाराष्ट्रासह दक्षिण भारत आणि श्रीलंकेतच वाढते. कुसर ही जाई, जुई व मोगऱ्याच्या गटातील एक रानटी वनस्पती आहे. कुसरचे झुडूप गच्च पानांमध्ये काही वेळा मोठ्या झुडुपांच्या आधाराने वाढते. कुसरची पाने एकमेकांविरुद्ध वाढणारी चकचकीत असतात. हिवाळ्याच्या मध्यावर कुसरला फुले येतात. ही फुले सुहासिक काहीशी मोगऱ्यासारखी दिसणारी पण टोकदार असतात. फांद्यांच्या तोंडाशी येणाऱ्या गुच्छात फुले येतात. कधी कधी गुच्छात चाळीस ते पन्नास फुले असतात. रात्री उडणाऱ्या पतंगामुळे कुसरचे परागीभवन होते. व त्यास काळी फळे लागतात. ज्यामध्ये मोठी बी असते. गिरीजन लोकांना ते आवडते. यांना घुगऱ्या असे विशेष नाव आहे. . इंग्रजीत तिला ‘मलबार जास्मिन’ असे म्हणतात.



प्रश्न :

१) कुसर आहे एक –

१)वृक्ष, २) वेल, ३) झुडूप, ४) जलवनस्पती.


२) ‘मलबार जास्मिन’ हे आहे. –

१) पेय, २) कुसरचे फळ, ३) मोगऱ्याचे इंग्रजी नाव, ४) कुसरचे इंग्रजी नाव.


३) कुसरचे परागीभवन होते. –

१) सूर्य उगवल्यावर सकाळी, २) दुपारी, ३) सूर्य मावळल्यानंतर उगवेपर्यंतचा काळ, ४) सायंकाळी.


४) गिरीजन म्हणजे असावेत.-

१) गिरीतील कुसर फुले, २) डोंगर कपारीत राहणारे लोक.३) रानटी वनस्पती, ४) कुसरचे चकचकीत गुच्छ.


५) कुसरच्या फुलांचा असतो. –

१) थवा, २)माळ,३) गुच्छ,४) गालिचा.


उत्तरे :१) 3 , २) 4, ३) 3 , ४) 2 , ५) 3 ,


बुधवार, २७ मे, २०२६

आकलन उतारा /परिच्छेद क्रमांक ४

  उतारा 

परिच्छेद क्रमांक ४



दोन राज्ये परस्परांना लागून होती. एक राजा समाधानी होता. त्याची प्रजा सुखी होती. दुसरा राजा मात्र शेजारील राजा कधी मरेल. व त्याचे राज्य आपण कसे बळकावू याची वाट पाहत होता. त्याने दूत पाठवला. दूताने औपचारिक भेट घेऊन नंतर राजाला त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य विचारले. राजा हसत बोलला, “ तुमच्या राज्यात १०० वर्ष जुना वटवृक्ष आहे. तो जेव्हा निर्जीव होईल. तेव्हा तू मला भेट. मी माझ्या दिर्घ आयुष्याचे रहस्य सांगेन." दूताने माघारी येऊन राजाला निरोप सांगितला. तेव्हा पासून दुसऱ्या राज्याचा राजा तो वृक्ष केव्हा निर्जीव होईल. व त्याला त्या राजाच्या आयुष्याचे रहस्य समजेल असे त्या राजाला झाले. तो वृक्ष मेला. व दूत दुसऱ्या राजाकडे ते रहस्य जाणून घेण्यासाठी गेला. तेव्हा तो राजा म्हणाला, “बघ, एवढा प्राचीन वृक्ष ! पण तुझ्या राजाच्या वाईट इच्छेने काही दिवसातच जळून गेला. त्याच प्रमाणे प्रजा जर असंतुष्ट असेल तर राजाचे आयुष्य आपोआपच घटू लागते.”


प्रश्न :

१) दुसरा राजा वाट पाहू लागला. –

१) पहिल्या राजाची. २) राजदूताच्या निरोपाची. ३) वृक्षाच्या अमरत्वची. ४) पहिल्या राजाच्या मृत्यूची.


२) वटवृक्ष जिवंत राहू शकतो. –

१) फक्त शंभर वर्षे, २) शंभर वर्षापेक्षाही जास्त काळ, ३) राजाची मर्जी असे पर्यंत, ४) फक्त दहा वर्षे.


३) राजच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य होते. –

१) वटवृक्षात राजाचे प्राण होते.,२) संजीवनी मंत्र त्यास येत होता. ३) वटवृक्षाच्या मुळ्या तो खात असावा.४) राजाची समाधानी वृत्ती व त्याचे प्रजेवरील प्रेम.


४) वटवृक्ष जळून गेला कारण –

१) राजाने त्याच्या मुळांना आग लावली. २) राजाची त्याकडे पाहण्याची वाईट दृष्टी.३) दूताने वटवृक्षावर विष प्रयोग केला. ४) वटवृक्ष केवळ शंभर वर्षे जगू शकतो.


५) उताऱ्यास योग्य शीर्षक द्या. –

१)वटवृक्षाचे अमरत्व,२) दोन राजे व वटवृक्ष.३) सदिच्छा, ४) दोन राज्ये.



उत्तरे : १) 4 , २) 2 , ३) 4 , ४) 2 , ५) 2 .


मंगळवार, २६ मे, २०२६

परिच्छेद क्रमांक ३/ pariched /utara

 Marathi bhasha utare 

परिच्छेद क्रमांक ३




मार्तंड मंदिर हे सूर्याला अर्पण केलेले जमिनीवरील पंचमहाभूतांचे उगमस्थान. जम्मू मधील अनंतनाग पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. आठव्या शतकात इसवी सन ७२५ ते इ. स. ७५६ मध्ये बांधले गेले. जम्मूच्या राजा राणादित्याने ते बांधताना चायनीज, गंधारन, गुप्त, जापनीज व ग्रीक स्थापत्याचा अभ्यास करुन बांधले. ३२ एकर आवारात २२० फूट लांब व ४० फूट उंच व ८४ खांबावर उभारलेले उत्तर भारतातील एकमेव मंदीर आहे. मंदिरातील खांबावर व भिंतीवर देखणी व प्रभावशाली शिल्पशैली पहायला मिळते. शिल्पात भारतातील नद्या स्त्री रुपात सूर्याला अर्घ्य वाहत आहेत. असे कला अभ्यासकांना वाटते. अर्थातच नद्या, सूर्य, वायु, पाषाण ही निसर्गाची मूळ रुपे आहेत. हिंदू देवतांची काल्पनिक पण अत्यंत सुरेख व त्रिमिती रचनेत मांडलेली शिल्पे लक्ष वेधून घेतात. खांबावरील नक्षीकाम, कोरीवकाम, भौमितिक आकार तसेच आर्य कालीन भाषा व आडव्या उभ्या रेषांमधून टिंबाच्या नक्षीदार रचना असलेल्या आकृती या मार्तंड सूर्य मंदिरात पहायला मिळतात.


प्रश्न :

१) मार्तंड मंदिर अर्पण केले आहे?

१) परमेश्वररुपी मानवास. २) राणादित्यास. ३) सूर्य देवाला ४) पंचमहाभूतास.


२) मंदिरातील शिल्पात शिल्प नसावे. –

 १)सूर्यदेवता. २)भारतातील नद्या. ३)वायुदेवता. ४) येशू ख्रिस्त.


३) सूर्य मंदीर बांधले गेले.-

१) आठव्या शतकाच्या पूर्वार्धात. २) आठवे शतक संपताना. ३) सातव्या शतकात. ४) इसवी सन ७५० ते इ. स. ८२५ मध्ये.


४) सूर्य मंदीर बांधताना वापरली न गेलेली शैली.-

१) गुप्त व जापनीज. २) ग्रीक व चायनीज. ३) गांधारण व गुप्त. ४) इराणी व इजिप्तशियन.


५) मंदिरात कोणत्या लिपीतील अक्षरे पहायला मिळतील.-

१)ग्रीक. २) गंधारण. ३)आर्यकालीन. ४)जापनीज.


६) आठव्या शतकात शिल्पकारांना ज्ञान होते.-

१) इस्लामिक तत्वज्ञानाचे. २) मंदिरातील भूतांचे. ३) भूमितीविषयक संकल्पनांचे. ४) युरोपियन संस्कृतीचे.



उत्तरे : १) 3 , २) 4 , ३) 1 ,४) 4 , ५) 3 , ६) 3.


सोमवार, २५ मे, २०२६

आकलन उतारा परिच्छेद क्रमांक २

  आकलन उतारा 


परिच्छेद क्रमांक २



एका देवळाच्या प्रांगणात एक मोठा नाग राहत होता. तो कारण नसताना इतरांना चावत असे. ज्यामुळे एक बैल, दोन लहान मुले, एक पुरुष व एक स्त्री मरण पावले. त्या देवळात एक साधू आले. गावकऱ्यांनी त्यांना नागाची हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी नाग साधुपुढे फणा काढून उभा राहिला. प्राणी भाषा समजणाऱ्या त्या साधूने निष्कारण लोकांना त्रास देऊ नकोस असे सांगितले. नाहीतर लोक तुला मारतील. साधू निघून गेले. नाग एका कोपऱ्यात पडून राहू लागला.


         काही दिवसांनी साधू परत आले. त्यांनी पाहिले नाग जखमी होता. त्यांनी त्याच्या जखमांवर औषध उपचार केला. ते नागाला म्हणाले, “ तू इतरांना निष्कारण चावणे वाईट. पण फणा उभारणे हा तुझा मूळचा स्वभाव बदलू नकोस. इतरांच्या मनात तुझी आदर युक्त भीती असलीच पाहिजे.” तेव्हा नाग फणा काढू लागला. व तो देवाचा नाग म्हणून मान्यता पावला.


प्रश्न :

१) नाग राहत होता –

१) मंदिरात. २) मंदिराच्या आवारात. ३) कळसावर. ४) मंदिरातील पिंडीवर.


२) नागाच्या चावण्याने बळी पडले. –

१) एक बैल व दोन लहान मुले.२) एक पुरुष व स्त्री.३) दोन लहान मुले व पुरुष अन् स्त्री. ४) पाच सजीव प्राणी.


३)साधूला येत होती.-

१) सर्पांची भाषा.२) सर्प पकडण्याची कला.३) नागाच्या चावण्यावरील उतारा. ४) प्राण्यांची भाषा.


४)नागाच्या शरीरावर जखमा झाल्या कारण –

२) इतरांना चावल्याने.२) इतरांनी चावल्याने.३) अहिंसक वृत्तीचा परिणाम.४) चावण्याचा परिणाम.


५) नागाच्या जखमेवर औषध उपचार केला –

१) देवाने.२)साधूने.३) स्वतः नागाने.४)लोकांनी.


६) या उताऱ्यातून आपण शिकतो. –

१)इतरांना चावणे वाईट असते.२) फणा काढावा. पण इतरांना चावू नये.३) आपल्या वर्तनातून इतरांना नुकसान न होता. आदर निर्माण करणे. ४) आपल्या वागण्यातून इतरांना त्रास देणे.




उत्तरे : १) 2, २) 4 ,३) 4, ४) 3, ५) 2, ६) 3.


शनिवार, २३ मे, २०२६

परिच्छेद क्रमांक 1/ उतारा

 


परिच्छेद क्रमांक 1

आपल्याकडे ‘ बॉम्बिक्स मोरी’ नावाच्या किडीपासून उत्तम रेशमाची निर्मिती होते. चित्तूर जिल्ह्यातील मलबेरी फळांच्या बागांमधल्या किड्यांना अहिंसा सिल्क ( रेशीम किडे न मारता बनवलेले) बनवण्यास वेताच्या टोपल्या ठेवतात. मलबेरीची पाने खाऊन किडे डोक्याजवळील ग्रंथीतून द्रव सोडतात. त्यात फ्रायबोईन म्हणजे कच्चे रेशीम व सेरोसिन म्हणजे नैसर्गिक फेविकॉल असते. वायू संपर्कामुळे ते कडक होते. अतिशय नाजूक तंतुमय द्रव किडे सतत सोडतात. जवळ जवळ १००० यार्ड इतकं, याचाच रेशीम कोश बनतो. सात ते दहा दिवसात नैसर्गिकरीत्या किड्यांचा पतंग होतो. व यानंतर अहिंसा रेशीम बनवण्यासाठी किडे व कोश घेतले जाते. साधारण तीन महिन्यात अहिंसा रेशीम बनते. जे सुळसुळीत व चमकदार नसते. पूर्वेकडे बंगालमध्ये टसर सिल्क तर दक्षिणेत मुगा, इरी सिल्क असेच सिल्कचे प्रकार आहेत.


प्रश्न :

१) बॉम्बिक्स मोरीचे खाद्य –

१) मलबेरीची फळे २) मलबेरीची दले.३) वेताची पाने. ४) अहिंसक पाने.


२) फ्रायबोईन म्हणजे –

१) कच्चे रेशीम २) सेरोसिन ३) रेशीम कोश ४)सेरोसिन व न पक्व झालेले रेशीम.


३) किड्यांचा पतंग बनतो –

१) सहा ते सात दिवसात. २) पंधरा दिवसात.३) एक आठवडा ते दशमी पर्यंत. ४) आठ ते दहा दिवसात.


४) रेशीम किडे न मारता बनवलेले म्हणजे –

१) रेशीम किडा काढून टाकून. २) रेशीम किडे नष्ट करून. ३) किड्यांचा पतंग झाल्यावर गोळा करून.४) किड्यांची हिंसा करून.


५) अहिंसा सिल्कचे प्रकार आहेत?

१) तीन २) चार ३) दोन ४) एक.


६) किडे द्रव सोडतात. –

१) डोक्यावरील ग्रंथीतून. २) डोक्याजवळील ग्रंथीतून.३) मानेतून.४) गुडग्यातील ग्रंथीतून.




उत्तरे : १) 2 २) 1 ३) 3 ४) 3 ५) 2 ५) 2


मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61

  मराठी आकलन उतारा परिच्छेद क्रमांक 61  हे जगातल्या काही उत्तम पक्षी अभयारण्या पैकी एक आहे. सर्व प्रकारच्या पक्षांना या अभयारण्यात सुरक्षित...